Woljeongsa बुद्धिस्ट टेम्पल स्टे
मी कधी कोरियाला जाईन अस वाटलं नव्हतं. पण २ वर्षांपूर्वी साऊथ कोरियाला एका मैत्रिणीच्या लग्नाला जायचा योग आला. अगदी जायच्या दिवसापर्यंत अमेरिका आणि नॉर्थ कोरियाचे काहीतरी चालूच होते त्यामुळे जायला मिळेल कि नाही अशी भीती होती पण फायनली मी आणि माझे फ्रेंड्स सेऊल ला पोहोचलो
लग्नानंतर माझ्या कोरियन मैत्रिणीने आणि तिच्या नवर्याने सगळ्यांसाठी एक मस्त वेगळा प्लॅन केला होता. आम्ही सगळे Woljeongsa च्या टेम्पलमध्ये एक रात्र मॉंक स्कुल एक्सपीरियन्स घायला गेलो. हा एक खूपच आगळा वेगळा अनुभव होता.
आम्ही सर्वजण साधारण दुपारी ३ वाजता बुद्धिस्ट टेम्पल/ मोनेस्टरी मध्ये पोहोचलो.
गेल्यावर सर्वांना थोडी माहिती दिली आणि मुले आणि मुली ना वेगवेगळ्या खोल्यात नेले. तिकडे आमच्यासाठी जी लेडी मॉंक दिली होती तिने सर्वांना तिथे घालावयाचा एक ड्रेस दिला आणि तो कसा घालायचा हे पण शिकवलं.
त्यानंतर आम्ही सर्वजण एका हॉल मध्ये जमलो. तिथे मोनेस्टरीच्या मुख्य गुरूंनी आम्हाला भाषण दिले. साधारण एक दिवस आम्ही काय करणार आहोत , थोडी आश्रमाची माहिती, तिथले नियम सांगितले आणि आमचे स्वागत केले. ते सगळे कोरियन मध्ये बोलत होते आणि माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याने आम्हाला इन्ग्लिश मध्ये ट्रान्सलेट करून सांगितले.
त्यानंतर एक पुरुष आणि एक स्त्री असे दोन असिस्टंट गुरु आम्हला शिकवायला , मदत करायला आले. त्यातील एक मेल गुरु भारतातून आले होते त्यामुळे त्यांच्याशी मी थोडे हिंदीत बोलून घेतले. त्यांनी प्रथम आम्हला नमस्कार कसा घालायचा ते दाखवले. हे जरा मेहनतीचे काम होते. हे म्हणजे ३ स्टेप्स अँड बाउ असा प्रकार होता. साधारण साष्टांग नमस्कारा सारखा. आणि हे असे पुढे बऱ्याच वेळा आम्हाला करायचे होते. भरपूर व्यायाम होता आणि असा नमस्कार घालताना एक मंत्र म्हणायचा होता. बुद्धम शरणं गच्छामि चे कोरिअयन भाषांतर. सर्वां बरोबर हे सर्व असे छान एका लयीत म्हणताना खरंच खूप शांत वाटत होत.
त्यानंतर आम्हला सर्वांना रात्रीच्या जेवणासाठी नेले . तिकडे रात्रीचे जेवण संध्याकाळी ५.३० ला च असते. हे जरा कठीण होते. पण नियम म्हणजे नियम. आम्ही सर्व एका हॉल मध्ये गेलो. सर्वांना कामे वाटून दिली होती. त्याप्रमाणे आम्ही सर्वांनी पाट, पाणी, जेवण हॉल मध्ये आणून ठेवले. मग सगळ्यां ना आमच्या गुरूंनी कसे जेवयाचे त्याचे नियम सांगितले. प्रथम कुठल्या साइडच्या बाऊल मधून घ्यायचे , सगळे जेवण कसे संपवायचे, पण एकही दाणा उरता कामा नये. अशी सगळी नियमावली सांगून झाल्यावर आम्ही न बोलता जेवायला सुरवात केली. जेवताना न बोलण्याचा पण नियम होता.
जेवण झाल्यावर सागळेजण संध्याकाळच्या प्रार्थनेसाठी मोठ्या मंदिरात जमलो . त्याआधी एका मोठ्या घंटेजवळ जाऊन घंटानाद केला. मोठ्या मंदिरात बुद्धाची एक मोठी मूर्ती आहे. तिथे मग मेन गुरूंनी येऊन प्रार्थनेला सुरवात केली. मागाप्रमाणेच प्रत्येक मंत्रासोबत एक पूर्ण नमस्कार ...3 स्टेप्स आणि एक साष्टांग नमस्कार. त्यानंतर सगळेजण ध्यानाला बसले. आम्ही पण थोडावेळ ध्यान करून आमच्या हॉल कडे परतलो.
खरंच मनापासून तो शांत, पर्वतांनी वेढलेला आणि स्वच्छ परिसर बघून खूप मस्त वाटत होत. हॉलमध्ये परतल्यावर परत सगळे जण समोरासमोर तोंड करून दोन लाईनीत उभे राहिलो. आता रात्रीची शेवटची ऐक्टिव्हिटी करायाची होती. १०८ मण्याची जपाची माळ बनवायची होती पण नुसती नाही तर प्रत्येक मणी ओवून झाल्यावर एक साष्टांग नमस्कार आणि तो करताना नेहमीप्रमाणे बुद्धम शरणं गच्छामि चा मंत्र कोरियन मध्ये म्हणायचा.
मी मनात जेवढेवेळा नमस्कार करता येईल तेवढा करू असा विचार केला होता पण १०८ वेळा सगळ्यांबरोबर कधी पूर्ण केला कळलंच नाही. ग्रुप मध्ये एकादी अवघड , कंटाळवाणी गोष्ट सुद्धा किती मजेत पूर्ण होते ते कळलं. ती जपाची माळ मी अजूनही जपून ठेवली आहे. आता मात्र सगळेजण दमलो होतो. परत उद्या सकाळी ४ वाजता तयार राहायचं होत त्यामुळे मग सगळेजण अंघोळ करून ९ वाजता झोपलो सुद्धा.
दुसर्या दिवशी बरोबर ४ वाजता सगळेजण आवरून तयार होतो. मग आम्हा सर्वांना परत कालच्या मोठ्या मंदिरात प्रार्थनेसाठी नेले. आणि संध्याकाळप्रमाणेच प्रार्थना , नमस्कार , मंत्र सगळे करून ६ वाजता नाश्टा करायला गेलो. इथे मात्र काही वाढपी होते पण अर्थातच खाऊन झाल्यावर आपली ताटली आपणच नीट विसळून जाग्यावर ठेवायची होती.
आता शेवटची आणि जरा अवघड परीक्षा द्यायची होती. सगळेजण आता जंगलात गेलो आणि साधारण १ किलोमीटरचा ओबडधोबड , छोटे खडे असलेला रस्ता ३ स्टेप्स आणि साष्टांग नमस्कार करत आणि तोंडानी मंत्र म्हणत पार करायचा होता. कारण देहाला क्लेश दिल्याशिवाय मोक्षाचा मार्ग मिळत नाही अशी बुद्धिस्ट शिकवण आहे. आणि अर्थाताच आम्ही सगळाच मॉंक स्कुल एक्सपीरियन्स घायला गेलो होतो तेव्हा हे करणे भागच होते. अर्थाताच आम्हाला कसलीही जबरदस्ती नव्हती.
ज्यांना पूर्ण नमस्कार करणे शक्य नव्हते त्यांनी अर्धा नमस्कार केला तरी चालणार होते. अर्धा म्हणजे ३ स्टेप्स आणि फक्त कंबरेत वाकून नमस्कार करणे. मी प्रथम थोडावेळ पूर्ण नमस्कार केला पण मग मात्र अर्धाच . सुखी देहाला यापेक्षा जास्त कष्ट मी देऊ शकत नव्हते :) मला मोक्षाची घाई नव्हती.
यानंतर मग बराच वेळ फोटो सेशन करून सगळेजण २-३ मॉंक बरोबर चहा आणि कॉफी घेत थोडावेळ गप्पा ,चर्चा करत बसलो.
त्यानंतर मग सगळेजण आवरून ९ किलोमीटरचा हाईक करून पुढच्या मॉनेस्ट्रीत जायला निघालो.
प्रत्येक ट्रिप मध्ये काहीतरी वेगळे करायचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आणि या ट्रिप मध्ये तर तो मस्तच पूर्ण झाला . त्यातलं सगळंच जरी पटल नसल तरी एक वेगळा अनुभव म्हणून खूपच मस्त वाटलं. मी आज पर्यंत अनेक देशात फिरले पण पूर्ण कोरियाच्या ट्रिप मध्ये मला एक गोष्ट मात्र जाणवली की हा एकच देश असा होता कि जिथे जेव्हा जेव्हा मी सांगितले कि भारतीय आहे तेव्हा तेव्हा कोरियन लोकांच्या डोळ्यात एक वेगळाच आदरभाव दिसला. जो मला आजपर्यंत कुठेच अनुभवायला नाही मिळाला. कदाचित बुद्धाच्या भूमीतून आले म्हणून तो आदर असावा. पण प्रत्येक वेळा ती कोरियन माणसाच्या डोळ्यातील चमक आणि आदरभाव बघून मनापासून खूप छान वाटले.
woljeongsa च्या या टेम्पल स्टे बद्दल अजून माहिती हवी असल्यास या साईटला भेट द्या: https://eng.templestay.com/page-templestay.asp
No comments:
Post a Comment