परदेशी राहाताना....
लहानपणापासूनच मला परदेशाचे फार आकर्षण होत आणि २००१ मध्ये जेव्हा जर्मनीत नोकरीची संधी चालून आली तेव्हा मी लगेचच फार काही विचार न करता , जर्मनीबद्दल फारशी माहिती नसताना इकडे येण्याचा निर्णय घेतला.
गेल्या १८ वर्षात खूपच बदल झालेले बघितले , अनेक चांगले ,वाईट अनुभव ही घेतले. प्रत्येक अनुभव काहीतरी देऊन गेला.
इकडे आलेल्या प्रत्येकालाच पहिला शॉक बसतो ते म्हणजे रविवारी सगळे बंद . आधी तर शनिवारी पण सगळी दुकान दुपारी १ वाजता बंद होत असत . मग थोड्या वर्षांनी शनिवारी दुपारी ४ वाजता बंद होऊ लागली . मग रात्री ८ वाजता आणि आता काही वर्षांपूर्वी पासून बरीच सुपर मार्केट रात्री १२ वाजता बंद होतात. पण बाकीची दुकान मात्र ८ लाच बंद होतात. आणि रविवारी काहीही झालं तरी सगळं बंद. Germany is all about planning in advance त्यामुळे आलं मनात , गेले दुकानात अस इथे नाही चालत.
दुसरी खूप जाणवणारी गोष्ट म्हणजे कस्टमर सर्व्हिस . पण मी पुण्यातून आल्यामुळे मला त्याचा फारसा त्रास नाही झाला. पु. ल. नी म्हणल्याप्रमाणे दुकानातली सर्वात दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट म्हणजे कस्टमर त्याचा इकडे भरपूर अनुभव येतो. पण नंतर त्याची सुद्धा सवय होते.
अगदी नवीन असताना अर्थातच कार नव्हती आणि रोज टॅक्सीची चैन परवडण्यासारखी नव्हती तेव्हा चालणे हा एकच पर्याय होता. पुण्यातून आल्यामुळे चालण्याची सवयच नव्हती. उठ बस बाईक , रिक्षा, कार अशी सवय. पण एकदा अचानक जीम मध्ये "Maiwanderung" म्हणजेच १ मे हाईक ची जाहिरात बघितली आणि हे आहे तरी काय म्हणून नाव रजिस्टर केलं. इकडे १ मे ला सुट्टी असते आणि सगळे अबाल वृद्ध, आई बाबा, मुले कुठेतरी निसर्गाच्या सांनिध्यात हाकीइंग साठी जातात. त्या एका हाईक पासून माझ्या हायकिंग चा श्रीगणेशा झाला. आणि मग विविध गृस्प बरोबर तर कधी एकटे असे अनेक १२-१५ किलोमीटर चे हाईक केले. अगदी आलप्स मध्ये पण हायकिंग केले . आजूबाजूचा सुंदर निसर्ग ,शांत, मोकळी , शुद्ध हवा आणि नवीन नवीन लोक , त्यांच्याबरोबर चालताना विविध विषयांवर गप्पा गोष्टी आणि अर्थातच हाईक च्या शेवटी कुठल्यातरी रेस्टोरंट मध्ये किंवा मग एखाद्या बीअर गार्डन मध्ये श्रमपरिहार असा मस्त प्रोग्रॅम बहुतेक सगळ्या रविवारी चालू झाला.
जर्मनीत आल्यावर इथल्या शिस्तीची ,स्वछतेची , लाल फितीच्या संथ कारभाराची सवय व्हायला थोडा वेळ लागतोच. रविवारी शांतता पाळणे म्हणजे अगदी आपल्या घरात सुद्धा आवाज करणारे वॊशिंग मशीन , व्हॅक्युम क्लिनर न लावणे, जोरात गाणी न लावणे अश्या गोष्टी बघून जरा चक्रायलाचं होते.
आपण थोडं त्यांच्या कलाने वागलो , थोडं अडजेस्ट केले न की कधी कधी काही छान अनुभव पण येतात.
नवीन असताना जेव्हा माझा जॉब गेला आणि मी एका कंपानीत इंटरव्ह्यू द्यायला जात होते. स्टेशवर उतरले तर बस गेलेली होती आणि छोट गाव असल्यामुळे टॅक्सी पण दिसत नव्हती , चालत गेले तर नक्कीच उशीर होणार होता. पण तेव्हड्यात एक बाई तिच्या म्हाताऱ्या बाबांना सोडायला स्टेशन वर कार नी आली. मला जर्मन पण फार येत नव्हतं पण माझा काळजीयुक्त चेहेरा पाहून जवळ आली आणि काय प्रॉब्लेम आहे विचारलं. मी जेव्हा सगळी गोष्ट सांगितली तेव्हा आपणहून मला तिच्या गाडीतून कंपनी पर्यंत सोडायला आली. असे अनेक छोटे मोठे चांगले अनुभव मला आले. माझ्या जन्मदात्या आई वडिलांप्रमाणेच मला इकडे अजून ३ आई वडिलांच्या जोड्या मिळाल्या. त्या सगळ्यांनी मला भरभरून प्रेम आणि आधार दिला . त्यांची गोष्ट लिहायला बसले तर पुस्तक च तयार होईल.
परदेशी राहताना आपण आपल्या परिवारापासून दूर असतो. पण आपला नवीन परिवार आपणच बनवायचा असतो. त्यासाठी आपल्यालाच पाहिलं पाऊल उचलावं लागत. मी मुळातच माणसांमध्ये मिसळणारी , सतत नवीन अनुभवाच्या शोधात असणारी असल्यामुळे मला जिवाभावाचे मैत्र इथेही मिळाले .
मी मीटप , इंटरनेशन सारखे गृप्स जॉईन केले. आज जवळ जवळ ६ वर्ष शहरात नवीन येणाऱ्या लोकांसाठी विवीध इव्हेंट मीटप आणी इंटरनेशन च्या माध्यमातून ऑर्गनाईझ करते आहेत. त्यातून अनेक लोक जोडली , अनेक घट्ट , मदतीला धावून जाणारी माणसे जोडली गेली.
भल्या पहाटे मी फोन केल्यावर लगेच मला घेऊन इमर्जन्सीत हॉस्पिटल मध्ये घेऊन जाणारा माझा अमेरिकन मित्र असेल, किंवा मला असह्य त्रास होत असताना रविवार घरी येऊन ओषध देणारी माझी इटालियन डॉक्टर मैत्रीण असो, मला बर नाहीये हे कळल्यावर माझ्यासाठी प्रार्थना करणारी , मी कधीही न बघितलेली माझ्या इराणी मैत्रिणीची आई असो, मला नेहमीच हक्कानी कधीही घरी जाता येईल अशी माझ्या तीनही आई वडिलांची घर असो , किंवा दरवर्षी माझ्याप्रमाणेच दिवाळीची वाट बघणारी आणि माझ्या घरी दिवाळी पार्टीसाठी स्पेशल गिफ्ट घेऊन येणारी माझी जर्मन, अमेरिकन , इटालियन , इराणी आणि इतर बऱ्याच देशातील माझे मित्र मैत्रीण असो .... या सगळ्यांनी माझे आयुष्य खरंच खूप सुंदर केले आहे.
परदेशात आल्यावर घर, गाडी , पैसा वगैरे मिळतच त्यात फार काही विषेश नाही. पण अशी आजूबाजूला असेलेली जिवाभावाच्या माणसांची श्रीमंती मात्र नक्कीच सगळ्यांना नाही मिळत . मला मात्र ही श्रीमंती भरपूर मिळाली आहे आणी ही अशी श्रीमंती वाढत जाऊदे एवढीच इच्छा आहे.
No comments:
Post a Comment